केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते खादी आणि ग्रामोद्योग आयोजित ‘खादी महोत्सवाचे’ उद्घाटन

0
9

मुंबई, 2 ऑक्‍टोबर 2023-केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी आज खादी आणि ग्रामोद्योगाने आयोजित केलेल्या खादी महोत्सवाचे मुंबई येथे उद्घाटन केले. याप्रसंगी संबोधित करताना नारायण राणे यांनी खादी आणि ग्रामोद्योगच्या कार्याचे कौतुक केले. गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग करत असल्याचे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांपासून खादी आणि ग्रामोद्योग अतिशय चांगले कार्य करत आहे. 2014-15 मध्ये केव्हीआयसीचा व्यवसाय 30 हजार कोटी होता तर आज केव्हीआयसीचा व्यवसाय 1 लाख 34 हजार कोटीपर्यंत गेला आहे. गेल्या नऊ वर्षात कार्यपद्धतीतील बदलामुळे हे शक्य झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान 34 टक्के आहे. यात खादी आणि ग्रामोद्योग यांचाही मोठा वाटा यापुढील काळात असावा, अशी इच्छा नारायण राणेंनी व्यक्त केली.

महात्मा गांधींनी खादीच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर दिला होता. ग्रामीण भागांमध्ये रोजगारनिर्मिती झाली पाहिजे. गाव सुधारली तर देश सुधारतो हा विचार गांधीजींनी दिला, आज पंतप्रधान मोदी यावर भर देत आहेत. तसेच महात्मा गांधी यांचा स्वच्छतेविषयीचा संदेश सर्वांनी अंमलात आणला पाहिजे. महात्मा गांधींनी खादीला स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडले. खादीच्या प्रसाराचे कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे.

  

सर्व जगाला आदर्श वाटणारे बापू आपल्या भारतात होऊन गेले याचा आपल्याला अभिमान आहे. गांधीजींच्या स्वच्छतेविषयीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतले, असे केंद्रीय मंत्री राणे म्हणाले. 2030 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था निर्धार पंतप्रधानांनी केला आहे. जनतेचे सहकार्य मिळाल्यास कोणतेही लक्ष्य लहान नाही.

2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर खादी महोत्सव राबवण्यात येत आहे. यात केवळ खादीच नाही तर स्थानिक उत्पादनांच्या प्रसारासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे. या कालावधीत खादी उत्पादनांवर 20 ते 25 टक्के सुट देण्यात येणार आहे. युवकांसाठी जिंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच खादी आणि ग्रामोद्योगवर आधारीत व्हिडीओ गेम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.