पेट्रोल ३६ पैसे तर डिझेल ८७ पैशाने महाग

0
20

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्याने देशातही पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या भावात ३६ पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या भावात ८७ पैसे प्रति लीटर वाढ झाली.

गत पाच महिन्यांतील पेट्रोलची ही पहिली भाववाढ आहे; तर डिझेलची आॅक्टोबरनंतरची तिसरी दरवाढ आहे. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन(आयओसी) या प्रमुख सार्वजनिक तेल कंपनीने दिलेल्या एका निवेदनानुसार, नवे दर रविवारी मध्यरात्रीपासून लागू होतील. या भाववाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ६०.७० रुपयांवरून वाढून ६१.०६ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे भाव ४५.९३ रुपयांवरून ४६.८० रुपये प्रति लीटरवर पोहोचतील. यापूर्वी १६ जुलैला पेट्रोल दरात ३२ पैशांची वाढ करण्यात आली होती.