भूकंपाच्या धक्क्याने हादरला ईशान्य भारत

0
11

वृत्तसंस्था

नवी दिल्ली,दि.४– सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बांगलादेश, म्यानमारसह ईशान्य भारतातील मणिपुर, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.७ रिक्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. सहा जणांचा या भूकंपाच्या धक्क्याने झालेल्या पडझडीत मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले आहेत.

एनडीआरएफच्या दोन तुकड्या भूकंप प्रभावित क्षेत्रात तातडीने पाठवल्या आहेत. येथील बराचसा भाग हा दुर्गम असल्याने मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आसाममधून एनडीआरएफच्या दोन तुकड्या इम्फाळमध्ये पाठवण्यात आल्या असून १२ तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भूकंपाचे वृत्त मिळताच आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत याविषयावर चर्चा करुन तात्काळ मदत देण्याची सूचना केली आहे. मणिपूरात या भूकंपाने सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये इमारतींची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. म्यानमारमधील भू-स्तरात झालेल्या हालचालींमुळे हा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपाचे केंद्र इंफाळपासून ३३ कि.मी दूर आणि मणिपूरच्या तमेंगलाँग येथे असून ते जमिनीपासून १७ किलोमीटर खाली आहे. मणिपूरसह मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपूरासह उत्तर पूर्वेच्या अन्य राज्यांतही या भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमार आणि बांग्लादेशमध्येही भूकंपाचे धक्के नोंदवले गेले.