पेंच अभयारण्यात आढळला वाघाचा मृतदेह

0
14
नागपूर,दि.४ – चंद्रपूरमधील सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्‍या चार बछड्यांच्‍या भूकबळीचा प्रश्‍न ताजा असताना आता नागपूरच्‍या पेंच अभयारण्‍यात एका वाघाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ उडाली आहे. या वाघाच्‍या मृत्‍यूचे कारण अद्याप समोर आले नाही.पेंच अभयारण्‍यातील देवलापार बिटमधील ही घटना आहे. या वाघाचा मृतदेह आढळल्‍यानंतर वन्‍यजीवप्रेमींमध्‍ये विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. वाघाच्‍या मृत्‍यूचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नसले तरी, मृतदेह शवविच्‍छेदनासाठी पाठवण्‍यात आला आहे.
 काही दिवसांपूर्वी चार बछड्यांचा मृत्यू व त्यांना जन्म देणारी वाघीण बेपत्ता झाल्याने अख्खा वन विभाग हादरला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयची मदत घेतली जाणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात बोलताना केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात नवेगाव बीटमध्ये ही घटना उघडकीस आली होती. चार बछडे जंगलातच मृतावस्थेत आढळून आले, तर एका बछड्याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथील व्हेटर्नरी रुग्णालयात आणण्यात आले होते. आठवडा झाला तरी या बछड्यांच्‍या आईविषयी कोणतीही माहित समोर आली नाही.