आयुष क्षेत्रात 9000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध प्रस्ताव

0
19

सर्वात पहिल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषदेची उत्साहात सांगता.

आयुष क्षेत्रात गुंतवणूक आणि अभिनव संशोधनाच्या अमर्याद संधी आहेत : केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

भारताने पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व केले पाहिजे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आग्रही प्रतिपादन

देशातील 35 छावणी क्षेत्रांमध्ये लवकरच आयुष सुविधांची उभारणी होणार

मुंबई 23 एप्रिल 2022

गुजरातमध्ये गांधीनगर येथे भरलेल्या आतापर्यंतच्या सर्वात पहिल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषदेची काल रात्री उत्साहात सांगता झाली असून या परिषदेत आयुष क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी 9,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची स्वारस्यपत्रे सादर झाली आहेत. एफएमसीजी, वैद्यकीय मूल्याचे प्रवास (एमव्हीटी)आणि सेवा, औषधे, तंत्रज्ञान आणि रोगनिदान तसेच शेतकरी आणि कृषीक्षेत्राशी संबंधित उत्पादने या प्रमुख श्रेणींमधील गुंतवणुकीसाठी ही स्वारस्यपत्रे सादर झाली आहेत.

या परिषदेदरम्यान, विविध देश, प्रतिष्ठित संशोधन संस्था, शेतकरी गट आणि उद्योग यांच्या दरम्यान 70 हून अधिक सामंजस्य करार झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरझालेल्या करारांखेरीज या परिषदेमध्ये केंद्रीय आयुष मंत्रालय आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालय यांच्या दरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या कराराअंतर्गत देशभरातील 35 विविध छावणी क्षेत्रांमध्ये आयुष सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, ही शिखर परिषद या संदर्भातील सरकारी नीतीला धोरणात्मक पाठींबा देऊन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सक्षम चौकट विकसित करण्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरली. “संपूर्ण जगातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आयुष क्षेत्राकडून मिळत असलेल्या तुलनात्मक लाभांविषयी आणि या क्षेत्राच्या सामर्थ्याविषयी जाणीव झाली आहे.” ते पुढे म्हणाले. आयुष क्षेत्रात गुंतवणूक आणि अभिनव संशोधनाच्या अमर्याद संधी आहेत असे देखील त्यांनी सांगितले.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, या क्षेत्राची 2014 मध्ये केवळ 3 अब्ज डॉलर्सची असलेली उलाढाल आज 18 अब्ज डॉलर्स झाली असून हे क्षेत्र 75% चा वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक विकास दर दर्शवित आहे. लवकरच या क्षेत्रात गुंतवणूक करणारे अनेक स्टार्ट अप्स आणि उद्योग देशात सुरु होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, या क्षेत्रातील स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला आपल्या उत्पादनांचे अधिक उत्तम पॅकेजिंग केले पाहिजे आणि त्याला आक्रमक विपणन तसेच ब्रँडींग यांची जोड दिली पाहिजे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात भारताने विश्वगुरु होण्याची वेळ आता आली आहे. आपण सर्वांनी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या ब्रीद्वाक्याच्या प्रेरणेने काम केले पाहिजे आणि ‘हील इन इंडिया’ अर्थात ‘भारतात उपचार घेऊन आजारातून बरे व्हा’ या संकल्पनेला प्रोत्साहन देऊन भारताला वैद्यकीय पर्यटनासाठीचे जागतिक केंद्र म्हणून नावारूपाला आणले पाहिजे.”

परिषदेच्या समारोप सत्राला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद यशो नाईक आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ.महेंद्रभाई मुंजपरा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद 2022 हा भारताच्या प्राचीन विदवत्तेकडे आणि पारंपरिक ज्ञानाकडे जगाचे लक्ष वेधून घेऊन शाश्वत भवितव्यासाठी त्यावर आधारित मार्ग आखणे या उद्देशाने भारत सरकारने राबविलेला उपक्रम आहे. शाश्वत विकास ध्येयांतील “उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य” या तिसऱ्या क्रमांकाच्या ध्येयाला अनुसरून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेच्या तीन दिवसांच्या छोट्या कालावधीत येथे पाच समारोप सत्रे, आठ गोलमेज परिषदा, सहा कार्यशाळा आणि दोन परिसंवाद झाले. या परिषदेत सुमारे 90 ख्यातनाम वक्त्यांची भाषणे आणि 100 प्रदर्शनकर्त्यांची उत्पादने पाहायला मिळाली. या शिखर परिषदेमध्ये अमूल, डाबर, कामा आयुर्वेद, अॅकॉर्ड, आयुरवैद, नॅचरल रेमेडीज, अॅम्ब्रो फार्मा आणि पतंजली यांसह 30 हून अधिक एफएमसीजी कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ.टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या उपस्थितीत गांधीनगर येथील महात्मा मंदिरात 20 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन केले.