सीआयएफई अर्थात मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उद्योजकता विकास शिकवण्याची सुरुवात करावी – केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला

0
14

केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न

मुंबई, 23 एप्रिल 2022

देशातील मत्स्य आणि जलजीवन क्षेत्रातील मनुष्यबळ विकासविषयक प्रमुख संस्था असलेल्या सीआयएफई अर्थात मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उद्योजकता विकास शिकवण्याची सुरुवात करावी आणि विद्यार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती द्यावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज केली.

मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ आज मुंबईतील संस्थेच्या सभागृह परिसरात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

या पदवीदान संबोधन समारंभात आपल्या भाषणात मंत्री म्हणाले की भारतीय जलाशय-उत्पादनांना जगभरात मान्यता आहे आणि 8 हजार किमीच्या किनारपट्टीमुळे देशाच्या मत्स्योद्योग क्षेत्रात अमाप संधी आहेत मत्स्योद्योग क्षेत्रात आतापर्यंत पारंपरिक पद्धतींचा अवलंब होत होता. या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, असे त्यांनी नमूद केले. मत्स्योद्योग क्षेत्राला तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत असे सांगत नीलक्रांती घडवण्याच्या उद्देशाने देशाच्या मत्स्योद्योग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी तुमच्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा तुम्ही सर्वोत्तम वापर करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

देशातील मनुष्यबळ कौशल्यप्राप्त असले पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे, असे रुपाला यांनी सांगितले.  देशांतर्गत नद्यांमधील मासेमारीला प्रोत्साहन देण्याचा आग्रह धरत रुपाला म्हणाले की गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये देशांतर्गत मत्स्योत्पादनाची महत्त्वाची भूमिका आहे आणि आपल्याला या मुद्यावर देखील लक्ष पुरवण्याची गरज आहे.

केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते सीआयएफईच्या 15व्या पदवीदान समारंभात सीआयएफईचे माजी संचालक डॉ. दिलीप कुमार यांना मत्स्योद्योग क्षेत्रातील योगदानासाठी मानद D. Sc ही पदवी प्रदान करण्यात आली.

तसेच सीआयएफईच्या 15व्या पदवीदान समारंभात 230 मत्स्यविज्ञान पदव्युत्तर पदवीधर आणि 88 पीएच. डी धारकांना शैक्षणिक वर्षात केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते सर्वोत्तम गुणवत्तेसाठी विविध पुरस्कार/पदके यांच्यासह पदव्या प्रदान करण्यात आली.

 

कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. डॉ. मोहपात्रा यांनी आपल्या पदवीदान संबोधनात अन्न आणि पोषण सुरक्षेमध्ये मत्स्योद्योगाच्या महत्त्वावर भर दिला आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये युवा वर्गाची भूमिका अधोरेखित केली. देशात नील क्रांती आणण्याचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. पदवीधर विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे बनावेत यासाठी उद्योजकता विकासाच्या आवश्यकतेवर देखील त्यांनी भर दिला.

सीआयएफईचे संचालक आणि कुलगुरू डॉ. रवीशंकर सी एन यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेच्या शैक्षणिक वैशिष्ट्यांवर आणि संशोधनक्षेत्रातील कामगिरीवर भर दिला. संस्थेने हाती घेतलेल्या आघाडीच्या उपक्रमांमध्ये आणि नव्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये होत असलेले संशोधन आणि भर दिली जात असलेली क्षेत्रे या बाबी देखील त्यांनी अधोरेखित केल्या.