“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी”; नवनीत राणांची जहरी टीका

0
38

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दोन सभा घेत राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे. राज ठाकरेंनंतर आता भाजप देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेतील वाद सातत्यानं वाढला आहे.नवनीत राणा यांच्या खारघरमधील घरासमोर शिवसैनिकांना तोबा गर्दी केली आहे. त्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राणा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ज्या पद्धतीनं शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आहेत ते पाहता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, अशी टीका राणा यांनी केली आहे.

राणा दाम्पत्याकडून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर होत असलेली टीका पाहाता गृहमंत्र्यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे, बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी जाऊन आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत, असं देखील नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्तेचा दुरूपयोग करत आहेत. आम्हाला रोखण्यात येत आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. अवघ्या राज्याचं लक्ष मुंबईतील या वादाकडं लागलं आहे.