भारतातील ५७ टक्के डॉक्टर बोगस

0
15

देशातील तब्बल ५७ टक्के डॉक्टरांकडे वैद्यकशास्त्राची कोणतीही पदवी नाही.

नवीदिल्ली (पीटीआय),20-जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल; वैद्यकीय क्षेत्राचे विदारक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील तब्बल ५७ टक्के डॉक्टरांकडे वैद्यकशास्त्राची कोणतीही पदवी नाही. तसेच फक्त एक तृतीयांश डॉक्टरांनी माध्यमिक शिक्षण घेतले असून ते इतरांना औषधे देत असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.
‘हेल्थ वर्कफोर्स इन इंडिया’ या शीर्षकाने करण्यात आलेल्या अहवालामध्ये देशतील वैद्यकीय क्षेत्राचे विदारक वास्तव मांडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील फक्त १८ टक्के डॉक्टरांकडे वैद्यकीय पात्रता आहे. जवळपास १ लाख लोकसंख्येमागे असलेल्या ८० डॉक्टरांपैकी ३६ डॉक्टर असे आहेत, त्यांच्याजवळ अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेदिक संबंधित कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. हा अहवाल २००१ च्या जनगणनेनुसार सर्व जिल्हय़ातून जमविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आला आहे. त्यामुळे सध्यस्थितीत डॉक्टरांच्या दर्जाबाबत स्थिती अत्यंत भयावह असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चीनमध्ये १ लाख लोकसंख्येमागे १३० डॉक्टर आहेत. भारतामध्ये हे प्रमाण ८० डॉक्टर एवढे आहे. जर यातील वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले बोगस डॉक्टर बाजूला केले तर प्रतिएक लाख लोकसंख्येमागे देशात असणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण ३६ एवढेच मर्यादित असल्याचे या अहवालातून दिसून येते. आरोग्य क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढले देशाच्या आरोग्य क्षेत्रात सध्या महिलांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ३८ टक्के पुरुषांच्या तुलनेत ६७ टक्के महिलांनी वैद्यकीय पात्रता प्राप्त केली असल्याचे आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.