‘भगवंत मान संसदेत मद्यधुंद अवस्थेत येतात’

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान हे बऱ्याचदा संसदेमध्ये मद्यधुंद अवस्थेत येत असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रेमसिंह चंदुमाजरा यांनी लोकसभेत बोलताना केला आहे. आम आदमी पक्षाचे संगरूर मतदारसंघातील खासदार भगवंत मान यांनी संसदेच्या सुरक्षा नियमांचा भंग केला. मान यांनी स्वतःच्या घरून संसदेत जातेवेळीचा एक संपूर्ण लाइव्ह व्हिडियो क्‍लिप बनवून ती फेसबुकवर शेअर केली आहे. मान यांच्या या लाइव्ह व्हिडियो क्‍लिपने सुरक्षा यंत्रणांची मात्र झोप उडविली आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना चांदुमाजरा म्हणाले, ‘ते बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेत संसदेत येतात. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसणारे सदस्यच त्याबाबत माहिती देतात. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसणे असह्य असते. मान यांनी संसदेचा व्हिडियो बनवून घोडचूक केली आहे. यापूर्वी 2001 मध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडियोतून त्यांना काय संदेश द्यायचा आहे.‘ तसेच ‘हा प्रकार अत्यंत गंभीर असून जर हा व्हिडियो दहशतवाद्यांनी पाहिला तर त्यांना संसदेमध्ये पोचण्याचा प्रयत्न करू शकतात.‘

घरातून निघून संसदेपर्यंतचे व्हिडियो फेसबुकवर शेअर केल्याने मान चर्चेत आले आहेत. संवेदनशील स्थळाची दृश्‍ये सार्वजनिक केल्याने त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे.