‘आपले सरकार’ आहे, ही भावना निश्चितच निर्माण करु – फडणवीस

0
27

नागपूर- निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान करुन राज्यातील जनतेत हे ‘आपले सरकार’ आहे, ही भावना निश्चितच निर्माण करु, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, सीमाप्रश्न, एलबीटी, वीज, मुंबई विकास, कामगार कायदे यासारख्या अनेक मुद्यांवर राज्य शासन उचलत असलेल्या पावलांची माहिती आज विधानसभेत दिली. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शिवजयंतीदिनी 19 फेब्रुवारीला करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील स्मारक उभारण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या पाठपुरावा केल्यामुळे मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेस मुख्यमंत्र्यांनी सुमारे सव्वा तास आपल्या निवेदनाद्वारे उत्तर दिले. अभिभाषणाबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करणारा ठराव मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सभागृहाने मंजूर केला.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुंबई विकासावरील उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मुंबईच्या बऱ्याच प्रकल्पांशी संबंधित मंजुरी उदा. विमानतळ विकास, रेल्वे, बंदर, संरक्षण विभाग, तसेच इतर प्रक्रिया केंद्राशी संबंधीत असल्याने आपण पंतप्रधानांना त्यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीमार्फत याबाबत समन्वय ठेवावा अशी विनंती केली. मात्र, याचा अर्थ महानगरपालिका, एमएमआरडीए तसेच इतर संस्थांवर अविश्वास दाखविला असे नाही. विकास आराखड्यांना मंजुरी नसल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रलंबित 30 शहरांच्या विकास आराखड्यांना तातडीने मंजुरी देण्यासंदर्भात पाऊले उचलली जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.

साखर उद्योगाला ऊर्जितावस्था आणणार- शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर संकटातील साखर कारखान्यांच्या शॉर्ट मार्जिनचाही विचार केला पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील साखर उद्योगाला संजिवनी देण्याची गरज असून लवकरच सहकार मंत्री शिष्टमंडळासह केंद्राकडे एक प्रस्ताव सादर करतील. अतिरिक्त साखरेचा प्रश्न भेडसावत असून त्यासंदर्भातही एक धोरण ठरविण्यात येईल.
– एक महिन्याच्या आत मिहानमधील अडथळे दूर करणार, विजेचे दर कमी करून नियमित पुरवठा सुरु केला. संरक्षण विभागाच्या जमिनीबाबतीतही लवकरच निर्णय

– इंदू मिल जमिनीवर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचा विषय आमच्या प्राधान्यक्रमावर सर्वात वर, राज्य शासनाकडून केंद्राला हमीपत्र पाठवून दिले.

– कामगार कायद्यात सुटसुटीतपणा आणला, कारखाना सुरु करण्यासाठी परवाना प्रक्रियेत सुटसुटीतपणा व पारदर्शकता आणली

– घनकचरा विषयक धोरण लवकरच- घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मार्गदर्शक करण्यासाठी लवकरच धोरण निश्चित

– मेट्रो मार्गांना गती देणार- मुंबई, नवी मुंबई, ठाणे, बेलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी शहरांतील मेट्रो मार्गांना गती मिळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली.

– राज्यातील जास्तीत जास्त शहरे ‘स्मार्ट सिटी’ करणार

– राज्यात School of Planning and Architecture स्थापणार

– मुंबई सागरी मार्गाच्या अहवालाचे काम सुरु

– एल. बी. टी. रद्द करणारच, जी. एस. टी. कर प्रणाली राज्यांत लागू करणार

– सार्वजनिक-खाजगी सहभाग धोरण लवकरच

– पोलीस, सफाई कामगारांसाठी घरे

– प्रशासनात सुधारणा- प्रशासनातील निर्णय प्रक्रियेतील टप्पे कमी करण्यासाठी सुधारणा करणार

– ‘आपले सरकार’ ई पोर्टल- ‘आपले सरकार’ हे ई पोर्टल व मोबाईल एप्लिकेशन 26 जाने 2015 पर्यंत कार्यान्वित करणार.

– ईं टेडरिंग प्रणालीचा वापर करण्याची मर्यादा 10 लाखावरून 3 लाखापर्यंत खाली आणली.

– पर्यटन व सांस्कृतिक कार्य- वने आणि अभयारण्यातील वन्य जीवांचे संरक्षण करण्यासाठी पुष्कळ उपाय योजले जात आहेत.

– पुरेशा विजेची उपलब्धता- वीज निर्मिती होण्यासाठी उत्तम दर्जाचा कोळसा वेळेत उपलब्ध होण्याकरिता पाठपुरावा करीत राहणार

– जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून थोड्या कामांसाठी अडकलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करणार

– आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणार- वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी नियमानुसार कारवाई करण्यात येईल

– वनविकासासाठी प्रयत्न- चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता

– शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पावले, गुणवत्‍तापूर्ण शिक्षण देणा-या संस्‍थांना स्‍वायत्‍तता देणार

– महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नी सरकार राज्याची भक्कमपणे बाजू मांडणार, कोर्ट कमिशनर म्हणून जम्मू व काश्मीरचे भूतपूर्व मुख्य न्यायाधीश श्री. मनमोहन सरीन यांची नेमणूक केली.