लक्ष्मणरेषा ओलांडू नका – पंतप्रधानांची खासदारांना समज

0
10

नवी दिल्ली, दि. १६ – खासदारांच्या मुक्ताफळांमुळे भाजपा सरकारच्या अडचणी वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी समज दिली. मंगळवारी भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी वाचाळवीरांची कानउघडणी केली.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या खासदारांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे पक्षाची आणि सरकारची बदनामी झाली असून विरोधकांनी या मुद्यावर चांगलाच गोंधळ माजवला होता. त्यामुळे काहीवेळा तर खुद्द पंतप्रधानांना माफी मागावी लागली होती. या सर्वांमुळे नाराज झालेल्या पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत सर्वांना समज दिली. तसेच हाती घेतलेले काम फक्त कागदावर नको तर प्रत्यक्षातही दिसू द्या, असेही त्यांनी खासदारांना सांगितले आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्री साध्वी निरांजन ज्योती तसेच साक्षी महाराज यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांनी गोंधळ घातला होता. तुम्हाला रामजाद्यांचे सरकार हवे की हरामजाद्यांचे असे विधान साध्वींनी दिल्लीत प्रचारसभेत केले होते.दिल्लीकरांनी मत देताना ‘रामाचा सुपुत्र ’आणि ‘अनौरस’ यापैकी एकाची निवड करावी, असे त्यांनी म्हटले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी ज्योती यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला़ तसेच ज्योती यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले़ होते.