आदिवासी तरूणांच्या विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण सुरू करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर, दि. 16 : : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तरूण-तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र पोलिसांतर्फे सिव्हील लाईन्स येथील पोलिस जिमखाना येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेच्या’ सातव्या फेरीत सहभागी झालेल्या गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्बरीशराव सत्यवानराव आत्राम, राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ, पोलिस आयुक्त के.के. पाठक, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीतील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शासनामार्फत आदिवासी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सर्व योजना अतिदुर्गम भागात राहणा-या आदिवासी बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे, तसेच महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा सर्वाधिक निसर्गरम्य वातावरण येथे आहे. एवढेच नव्हे तर गडचिरोलीच्या संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळेच राज्यातील इतर क्षेत्र व देशातील विविध भागातील लोकांमध्ये गडचिरोली आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने गडचिरोलीचा विकास करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोलीत चांगले रस्ते, शाळा, महाविद्यालय उभारण्यात येतील. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा विकास करावा. इतर आपल्या वर्गमित्रांनाही पुढे जाण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा म्हणाले, गडचिरोलीचा विकास करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मात्र नक्षल्यांनी विकास कामात विविध अडथळे निर्माण केले आहे. या अडचणींवर मात करून गडचिरोलीत विकास कामे केली जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहलीत सहभागी झालेले विद्यार्थी लक्ष्मण कन्नाके, निलेश महा, मानताई मडावी, पुजा उसेंडी यांनी सहलीचे अनुभव कथन केले. तसेच विद्यार्थ्यांनी रेला नृत्य (माडिया) सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीमती रश्मी शुक्ला, सहपोलिस आयुक्त तथा नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अनुप कुमार सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र कदम, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक पांडे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, पोलिस उपायुक्त सर्वश्री अभिनाश कुमार, इशु सिंधू, विजय पवार, भारत तांगडे, संजय लाटकर, विशेष कृती दलाचे पोलिस अधीक्षक तथा अपारंपारीक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्रीकांत धिवरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते