गोवा-पंजाबमध्ये मतदानाला सुरुवात

0
3

चंदीगड/पणजी,वृत्तसंस्था दि. 4 – पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. गोव्यामध्ये सकाळी 7 वाजता तर पंजाबमध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्या मतदानाचा हक्कही बजावला. गेल्या वेळी झालेल्या 84% मतदानाचा विक्रम यावेळी मोडीत निघेल, अशी प्रतिक्रिया पर्रिकर यांनी मतदान केल्यानंतर दिली. तसेच भाजपाचा दोन तृतीयांश मताने विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाची युती लागोपाठ तिस-यांदा सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर गोव्यातही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला काँग्रेस आणि गोवा-पंजाबमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणा-या आम आदमी पार्टीकडून कडवं आव्हान दिलं जात आहे.गोव्यामध्ये 40 जागांसाठी एकूण 251 उमेदवार रिंगणात आहेत तर पंजाबमध्ये 117 जागांसाठी 1145 उमेदवार रिंगणात उतरलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच, शिवसेना आणि मगोपने महायुती केली आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी भाजपासाठी जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे.गोवा आणि पंजाबनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे