रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

0
9

रांची – भारतीय जनता पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रघुवर दास हे झारखंड राज्याचे पहिले बिगरआदिवासी मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल सय्यद अहमद यांनी दास यांना शपथ दिली.
रांचीतील बिरसा मुण्डा फुटबॉल स्टेडियमवर आज सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला. यावेळी दास यांच्यासह निळकंठ सिंह मुंडा, चंद्रेश्वर प्रसाद सिंह, चंद्रप्रकाश चौधरी आणि लुईस मरांडी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे सर्वत्र दाट धुके पसरले आहे. अनेक विमानांचे उड्डाणही रद्द करण्यात आले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.
२०००मध्ये बिहारपासून स्वंतत्र झालेल्या या राज्याने गेल्या १४ वर्षात नऊ सरकारे पाहिली आहेत तर तीन वर्ष राष्ट्रपती राजवटही पाहिली आहे. दास हे बाबुलाल मरांडी(एकवेळा), अर्जुन मुंडा(तीनवेळा), शिबू सोरेन(तीनवेळा), मधू कोडा(एकवेळा) आणि हेमंत सोरेन(एकवेळा) यांच्यानंतरचे दहावे मुख्यमंत्री आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात ३८ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या एजेएसयू पक्षाला पाच जागांवर विजय मिळवला आहे.