महाराष्ट्र विधान परिषद देशातील पहिले पेपरलेस सभागृह

0
12

मुंबई – विधान परिषदेला देशातील पहिलेवहिले पेपरलेस सभागृह बनण्याच्या दिशेने सरकारने वाटचाल सुरू केली आहे. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व सदस्यांच्या बाकांवरील कामकाज पत्राची जागा अत्याधुनिक टचस्क्रीन नाेटबुकने घेतली.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेला पाठिंबा म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान आपल्या सभागृहाला मिळत असल्याबाबत मला विशेष आनंद होत असल्याचे निंबाळकर म्हणाले. या नोटबुकमध्ये इंटरनेटची सुविधा असणार असून विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, नियम पुस्तिका, विधिमंडळाच्या विविध समित्या आणि महामंडळांचे अहवाल, तारांकित आणि अतारांकित प्रश्नांची यादी, स्वीकृत लक्षवेधी सूचना, सदस्यांचे वेतनभत्ते, आजीमाजी सदस्यांची माहिती आणि सभागृहाचे १९३७ सालापासूनच्या कामकाजाचे अभिलेख उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.
पेपरलेस व डिजिटल कामकाजाच्या दिशेने विधान परिषदेने वाटचाल सुरू केल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी या वेळी सभापतींचे अभिनंदन आणि कौतुुक केले. याबाबत भाई गिरकर म्हणाले, नव्या बदलाला सामाेरे जाताना त्याचा उपयाेग हाेणे गरजेचे अाहे. त्यामुळे या नव्या प्रणालीच्या अपडेट प्रक्रियेत अाम्हाला सहभागी करून घ्यावे. त्याची पूर्ण माहिती देण्यात यावी. नीलम गाेऱ्हे म्हणाल्या की, तंत्रज्ञानाची अावड असेल तर काम करणे साेपे जाते. परंतु, मधूनमधून ओरडणे थांबवू शकणारा टॅब नाही का? अशी खोचक विचारणाही त्यांनी केली.

फक्त माझ्याकडे काही फेकू नका
पेपरलेस सभागृहामुळे सदस्यांची आता मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना यापुढे कागदपत्रे फाडून आपली आक्रमकता दाखविता येणार नाही. मात्र, नोटबुक वगैरे फोडून माझ्यावर टाकू नका म्हणजे झाले, अशी काेपरखळी सभापतींनी या वेळी मारताच सभागृहात जोरदार हशा पिकला.
टचस्क्रीन नाेटबुकमुळे सदस्यांची डिजिटल वाटचाल
कागदे भिरकावणार कशी? सभागृहात अाक्रमकता दाखवण्यासाठी कामकाजाशी संबंधित कागदे फाडणे किंवा ती भिरकावण्याची सवय सदस्यांना असते. परंतु कागदांची जागा लॅपटाॅपने घेतल्यामुळे फाडायचे काय अाणि भिरकावायचे काय असा पेच पडल्याचे विराेधी बाकावरील सदस्यांनी बाेलून दाखवले.
खुणा, हातवारे कसे करणार : डिजिटल हाेत अाहाेत हे खरे असले तरी अाता सदस्य नाेटबुकमध्ये अापले डाेके खुपसून असतील. मग एकमेकांकडे पाहणे, खाणाखुणा, हातवारे कसे करणार. त्यामुळे कामकाजातील मजाच निघून जाईल की काय अशी शंका येते असे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.