शिवसेना खासदाराकडून एअर इंडियाच्या कर्मचा-याला चप्पलने मारहाण

0
6

नवी दिल्ली, दि. 23 – शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण करत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने गुरुवारी दिली.
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. विमानात बसण्याच्या जागेवरुन हा वाद झाला. रवींद्र गायकवाड आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी रवींद्र गायकवाड यांनी कर्मचा-याला शिवीगाळ करत मारहाण केली, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. तसेच, या मारहाणीसंदर्भात चौकशी करण्यासाठी एअर इंडियाने एक समिती स्थापन केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना रवींद्र गायकवाड म्हणाले की, माझे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र मला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी कर्मचा-याकडे तक्रार बूक मागितले. यावेळी एअर इंडियाचा तो कर्मचाऱ्यारी अरेरावी करत, माझ्या अंगावर धावून आला. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असे मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले, असे रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत.