IAS अधिकारी शहिदांच्या कुटुंबांना घेणार दत्तक

0
6
नवी दिल्ली, दि. 29 – नक्षलवादी तसंच दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांसाठी फक्त अश्रू ढाळत शोक व्यक्त करण्यापेक्षा आयएएस अधिका-यांनी त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. आयएएस अधिका-यांनी पुढाकार घेत शहिदांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी जीवाची बाजी लावून लढत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबावर त्यांच्यानंतर हालाखीत राहण्याची वेळ येऊ नये यासाठी आयएएस अधिका-यांनी हे स्तुत्य पाऊल उचललं आहे. त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण आणि कुटुंबाला लागणारी आर्थिक मदत याची काळजी अधिकारी घेतील.
‘आयएएस अधिका-यांच्या संघटनेने देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस अधिका-याची नियुक्ती असणा-या राज्यातील असेल’, अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (सेंट्रल) असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली आहे.