मालकंगिरी (ओडिशा) – शोधून देणाऱ्यास चार लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या चार महिला नक्षलवादी आज (शनिवार) पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. झिने पद्ममिनी ऊर्फ रिटा, वाल्ला गंगी ऊर्फ सकिला, कुमा खिला आणि सिंगे पदिमे ऊर्फ मासे अशी शरण आलेल्या चार नक्षलवादी महिलांची नावे आहेत. त्या पोलिस महानिरीक्षक यशवंत जेथवा यांच्यासमोर हजर झाल्या आहेत.
या महिला नक्षलवादी कालिमेला आणि बैपरिगुडा दलाम येथील एका नक्षलवादी संघटनेच्या सदस्य आहेत. त्या गेल्या पाच ते आठ वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत असल्याची माहिती जेथवा यांनी दिली. यापैकी झिने हिला शोधून देणाऱ्यास चार लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. दरम्यान बालिमेलातील तलावाजवळ पोलिस आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता जेथवा यांनी व्यक्त केली आहे. अद्याप मृतदेह मिळाले नसून, घटनास्थळी भेट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नक्षलवादी कधीच ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागू न देता पुरून टाकत असल्याचेही ते पुढे म्हणाले.