भाजपाला सरकार चालवता येत नाही – केजरीवाल यांचा पलटवार

0
9

नवी दिल्ली, दि. १० – भाजपाला सरकारही चालवता येत नाही आणि चांगले आंदोलनही करता येत नाही. पण आम्हाला दोन्ही जमते. आम्ही दिल्लीतील भ्रष्टाचारावर अवघ्या ४९ दिवसांमध्ये लगाम घातला होता असे सांगत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी आधी सत्तेत आल्यावर सहा महिन्यांमध्ये किती आश्वासनं पूर्ण केली याचे उत्तर द्यायला हवे असे आव्हानही त्यांनी मोदींना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत मोदींनी अत्यंत आक्रमकपद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मोदींच्या सभेनंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींना चोख प्रत्युत्तर दिले. भाजपाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक प्रचारात अनेक आश्वासनं दिली होती. त्यापैकी किती आश्वासनं त्यांनी पूर्ण केली असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. दिल्लीत भाजपाकडे काही मुद्दे नसून आपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे नेते घाबरले आहेत. म्हणून माझ्यावर वैयक्तीक आरोप केले गेले. पण मी आरोपांवर उत्तर देणार नाही असेही त्यांनी नमूद केले. भाजपाने दिल्लीत वीज दरात ३० टक्क्यांची कपात करण्याचे सांगितले आहे. पण आम्ही वीजेचे दर ५० टक्क्यांनी कमी करु शकतो. हा फॉर्म्यूला फक्त आपकडेच आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.
मोदी म्हणतात पंतप्रधान कार्यालय सात महिन्यांमध्ये साफ केले. मग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला त्यांना किती वेळ लागेल असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. आपने दिल्लीतील भ्रष्टाचार ४९ दिवसांत कमी केला असे त्यांनी सांगितले.

महिला म्हणजे मुलांना जन्म देणारी मशिन नव्हे
भाजपाचे एकंदरीत धोरण महिलाविरोधीच आहे. भाजपाचे नेते चार मुलांना जन्म द्या असे सांगतात. महिला म्हणजे मुलांना जन्म देणारी नव्हे असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. जीन्स पॅँटवर बंदी, मोबाईलवर बंदी हे सर्व प्रकार महिलाविरोधी असल्याचे दाखवतात असे केजरीवाल यांनी सांगितले.

अमित शहांना महागाईची माहिती नाही
बाजारातील महागाईचा आम्हाला अंदाज आहे. आमच्या घरातील लोकं खरेदीसाठी बाजारात जातात. पण अमित शहा यांना बाजारात जावे लागत नाही म्हणून महागाई घटल्याचा खोटा दावा ते करतात अशी टीका केजरीवाल यांनी केली. दिल्लीतील अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली असे अमित शहा सांगतात. पण त्यांचा हा दावाही खोटा आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून दिल्लीतील झोपडपट्ट्यांवरील संकट वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.