वर्धा – वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीविषयी भाजपची भूमिका बदललेली नाही. मी स्वतः आणि भाजपही वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूनेच आहे, असे उद्गार अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना काढले.
मुनगंटीवार म्हणाले, वेगळ्या विदर्भाची मागणी ही भावनिक नाही. ती वास्तववादी, भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगाने आहे. जनसंघाच्या 1952 ला झालेल्या अधिवेशनात तसा ठराव घेण्यात आला होता. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीही विदर्भ राज्याच्या बाजूने मत मांडले होते. विदर्भाची मागणी सर्व अंगाने विचार करूनच केली जात आहे. विदर्भाचा विकास झाला पाहिजे, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. विदर्भासोबत महाराष्ट्र आणि देशाचाही विकास झाला पाहिजे, असा विदर्भाच्या मातीचा स्वभाव आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. शेतमालाला योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे, याविषयी दुमत नाही; पण शेतकऱ्यांना शेती परवडेल, असे धोरण आम्हाला राबवायचे आहे. विदर्भातील शेतीक्षेत्राच्या विकासाकरिता येत्या पाच वर्षांत 35 हजार कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाने तयार केला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्धार केला आहे. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता यंत्रणा उभी केली जाईल. त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.