सिडनी कसोटी ‘ड्रॉ’!

0
11

सिडनी- कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायननं शेवटचा चेंडू टाकला आणि भारतीय क्रिकेटप्रेमींनी हे वाक्य पुटपुटत ‘हुश्श’ केलं. कारण, अॅडलेड कसोटीप्रमाणेच सिडनीतही विजयाचा मार्ग सोडून पराभवाच्या दिशेनं चाललेली टीम इंडिया जेमतेमच बचावली होती. अजिंक्य रहाणेच्या संयमी खेळीनं भारताचा पराभव टाळला होता, सिडनी कसोटी ‘ड्रॉ’ करून भारताची लाज राखली होती. अर्थात, ऑस्ट्रेलियानं मालिका आधीच जिंकली होती, पण सिडनी कसोटी जिंकून शेवट गोड करायचं, फिल ह्यूजला आगळी श्रद्धांजली वाहण्याचं स्मिथसेनेचं स्वप्न टीम इंडियानं पूर्ण होऊ दिलं नाही.

सिडनी कसोटीचं संपूर्ण स्कोअरकार्ड

अवसानघातकी फलंदाजीचं ‘तंत्र’ टीम इंडियाला जणू वारसा हक्कानंच मिळालं आहे आणि खास करून परदेशात आपले शिलेदार त्याचं जतन करताना दिसतात. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी विराटच्या वीरांनी त्याचंच दर्शन घडवलं. पण, बिकट परिस्थितीत कुणीतरी लढवय्या टिच्चून उभा राहून संघाचा तारणहार ठरतो, ही परंपराही त्यांनी जपली. अजिंक्य रहाणेनं ही भूमिका चोख वठवली आणि भारताला पराभवाच्या संकटातून सुखरूप बाहेर आणलं.

ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव, कालच्याच ६ बाद २५१ धावांवर घोषित करून टीम इंडियापुढे विजयासाठी ३४९ धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यात निश्चितच जोखीम होती, पण दोघांनाही समसमान संधी असल्यानं थोडी चुरसही निर्माण झाली. पाचव्या दिवशी भेगाळलेल्या पीचवर खेळणं भारतीय फलंदाजांना सोपं नव्हतं. पण मुरली विजय, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी सावध खेळ केला. चहापानावेळी टीम इंडिया २ बाद १६० अशी सुस्थितीत होती. शेवटच्या सत्रात ३३ ओव्हरमध्ये कोहली कंपनीला १८९ धावा करायच्या होत्या. अर्थात, वनडेसारखी फटकेबाजी केल्यास त्यांना विजयाचीही संधी होती. ते सोपं निश्चितच नव्हतं. पण, क्रिकेटप्रेमींना कुठेतरी आशा वाटत होती. असं सगळं पोषक वातावरण असतानाच, टीम इंडियाचं अचानक अवसान गळालं आणि विजय, कोहली, सुरेश रैना आणि वृद्धिमान साहा झटपट तंबूत परतले. भारताची अवस्था ६ बाद २०८ अशी झाली आणि पारडं ऑस्ट्रेलियाकडे झुकलं.

टीम इंडियाच्या शेवटच्या चौकडीला तब्बल १९ ओव्हर खेळून काढायच्या होत्या. सुदैवानं, अजिंक्य रहाणेनं एक बाजू लावून धरली होती. पण, सगळी मदार शेपटावरच होती. त्यात, अश्विन आणि भुवनेश्वर कुमारनं अत्यंत जबाबदार खेळ करत रहाणेला उत्तम साथ दिली. रहाणे-भुवीची जोडी फोडण्याचा कांगारू गोलंदाजांनी कसून प्रयत्न केला, पण त्यांना ते शेवटपर्यंत जमलंच नाही. त्यामुळे सिडनी कसोटी जिंकण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. मात्र, ऑस्ट्रेलियातील नव्या ‘स्टिव्ह पर्वा’ला स्मितहास्याने सुरुवात झाली. स्मिथनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी उंचावली, तेव्हा सगळ्यांनाच फील ह्यूज आठवला.

भारताविरुद्धच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये शतकं झळकावणारा स्टिव्ह स्मिथ सामनावीर आणि मालिकावीर ठरला.