दिल्लीत काँग्रेसचे ‘पॅकअप’

0
7

नवी दिल्ली, दि. १० – १५ वर्ष दिल्लीत सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत एकाही जागेवर विजयी मिळवता आलेला नाही. काँग्रेसच्या दृष्टीने ही अत्यंत निराशाजनक बाब असून या पराभवानंतर ‘प्रियंका गांधींना आणा, काँग्रेसला वाचवा’ अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

दिल्लीत शीला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सत्तेवर होता. तब्बल १५ वर्ष दिल्लीचे तख्त काँग्रेसकडेच होते. मात्र २०१३ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ८ जागांसह थेट तिस-या स्थानावर फेकला गेला. तर आम आदमी पक्षाने २८ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. काँग्रेस पक्षनेतृत्वानेही दिल्लीत प्रचारसभा घेतल्या असल्या तरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. याचे पडसाद निवडणुकीतही दिसून आले आहे. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.