आपचा विजय राजकारणाला कलाटणी देणारा क्षण – ममता बॅनर्जी

0
9

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपचे अभिनंदन केले आहे.
आपचे अभिनंदन करताना ममता बॅनर्जी यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. हा दिल्लीकर जनतेचा विजय आहे आणि जे अहंकारी आहेत, सूडाचे राजकारण करतात. लोकांमध्ये व्देष निर्माण करतात त्यांचा हा मोठा पराभव असल्याचे ममता बॅनर्जी यांनी टि्वटरवर म्हटले आहे.
दिल्लीची निवडणूक ही सध्याच्या राजकीय परिस्थितीला कलाटणी देणारा क्षण आहे. या निवडणुकीने लोकशाहीमध्ये सूडाच्या राजकारणाला स्थान नसल्याचे दाखवून दिले. देशाला हा बदल हवा होता. मी आपचे कार्यकर्ते, नेते आणि दिल्लीकर जनतेचे अभिनंदन करते. दिल्लीच्या निकालाने आम्ही खूप आनंदी आहोत. नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना माझ्या शुभेच्छा असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी ममता बॅनर्जींनी दिल्लीच्या जनतेला आपला मतदान करण्याचे आवाहन केले होते.