असे असेल केजरीवालांचे मंत्रिमंडळ, जुन्यांना डच्चू तर नव्यांना मिळणार संधी

0
12

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ हा सगळ्यांचा ‘बाप’ ठरला आहे. कॉंग्रेसचा सुपडा साफ करून ‘आप’ने भाजपचा विजयरथ रोखला आहे. ‘आप’ने आता दिल्लीत सरकार स्थापन करण्‍याची तयारी सुरु केली आहे. केजरीवाल यांच्या सरकारमधून काही जुन्या नेत्यांची ‘सुट्टी’ होणार आहे. तसेच त्यांच्या जागेवर नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यावेळी आपल्या मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांनाच सहभागी करून घेण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे केजरीवालांच्या कॅबिनेटमध्ये ‘आप’चे आमदार मनीष सिसौदिया, जरनैल सिंह, गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि आदर्श शास्त्री यांना महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा पराभव करणारे एस.के. बग्गा यांना देखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमनाथ भारती यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.
2013 मध्ये केजरीवाल सरकारमधील महिला व बालविकास मंत्री राखी बिडलान यांचा यांचा ‘पत्ता’ या वेळी कापला जाणार आहे. राखी बिडलान यांना जुनी वाद भोवणार असल्याचे दिसत आहे. राखी बिडलान मंगोलपुरीतून विजयी झाल्या आहेत.

तसेच गिरीश सोनी, सत्येंद्र जैन यांना स्थान मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. केजरीवाल यांच्या 2013 मधील सरकारमध्ये सगळे मंत्री होते. यंदा मात्र या नेत्याचा पत्ता कापला जाणार आहे.दरम्यान, अरविंद केजरीवाल ‘व्हॅलेंटाइन डे’ला अर्थात 14 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत ‘आप’चे काही मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे.