नितीशकुमार यांना पाटणा हायकोर्टाचा दणका, विधीमंडळ नेतेपदाची निवड ठरवली अवैध

0
16

नवी दिल्ली – बिहारच्या वर्तमान राजकीय संकटानंतर आमदारांना घेऊन राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दिल्लीत आलेल्या नितीशकुमार यांना हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. पाटणा हायकोर्टाने जनता दल (यू)च्या विधीमंडळ नेते पदाची निवड अवैध ठरविली आहे. जेडीयूच्या निर्णयाला स्थगिती देत कोर्टाने म्हटले आहे, की जोपर्यंत यावर बिहारच्या राज्यपालांचा निर्णय येत नाही तोपर्यंत ही स्थगिती असेल. जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांनी एक बैठक बोलावून नितीशकुमार यांनी विधीमंडळ नेतेपदी निवड केली होती. त्याविरोधात जीतनराम मांझी यांच्या गटाच्या एका आमदाराने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
‘मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूक’
बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडणे ही माझी चूक होती, याची नितीशकुमार यांनी पहिल्यांदाच कबुली दिली आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवणारे नितीशकुमार म्हणाले, मला असे कधीही वाटले नव्हते की मांझी असे काही करतील.
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आज (बुधवार) संध्याकाळी राष्टपती प्रणव मुखर्जींची भेट घेणार आहेत. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीनंतर मला वाटले होते, की पक्षासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला होता.’ त्यांचा रोख हा मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूक होती असाच होता.
माझ्याविरोधात भाजपचे षडयंत्र
नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘भाजपने मला वेगळे पाडण्याचे षडयंत्र रचले होते. मात्र वेळीच आमच्या पक्षाच्या हे ध्यानात आले. जनतेचा कल जाणून घेतल्यानंतर मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची तयारी केली आहे. जेवढा वेळ मिळेल तो बिहारच्या जनतेसाठी देण्याचा माझा निर्धार आहे.’ नितीशकुमार म्हणाले, की सरकारमध्ये माझ्या पुनरागमनाने भाजप घाबरली आहे आणि त्यामुळेच ते मला रोखण्यासाठी खटपटी करत आहेत.
नितीशकुमार ‘पॉलिटिकल टुरिझम’ करत आहेत – भाजपचा पलटवार
भाजप नेते शहानवाज हुसैन म्हणाले, की नितीशकुमार आमदारांना घेऊन दिल्लीला आले, हे त्यांचे ‘पॉलिटिकल टुरिझम’ आहे. नितीशकुमारांनी एक नाही तर अनेक चुका केल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींविरोधात लालूप्रसाद यादव आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली आहे. बिहारची जनता हे सर्व पाहात आहे, याचे उत्तर निवडणुकीतून त्यांना मिळेल. भाजप नेते सी.पी.ठाकूर म्हणाले, की नितीशकुमार हे मीडिया हाइपसाठी करत आहेत. जेवढ्या पैशांमध्ये ते आमदारांना विमानाने दिल्लीला घेऊन आले. त्यांची हॉटेलमध्ये राहाण्याची सोय करण्यात आली. एवढ्या पैशांचा बिहारच्या जनतेच्या कल्याणासाठी वापर करता आला असता.