खडसेंच्या वागणुकीने वैतागून राज्यमंत्री राठोडांचा राजीनामा, उद्धवनी बोलावली बैठक

0
11

मुंबई- भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये दरी वाढत चालल्याचे दिसून येऊ लागले आहे. शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या खात्याचे कॅबिनेटमंत्री एकनाथ खडसे हे आपल्याला काम करण्याची संधी देत नसल्याचे सांगत राजीनामा देऊ केला आहे. संजय राठोड यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव यांनी सर्व आमदार-खासदारांची बैठक पुढील दोन दिवसात मातोश्रीवर बोलावली असून त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, आम्हाला फक्त लाल दिव्याची गाडी दिली गेली आहे. महसूल राज्यमंत्री असूनही मदत व पुनर्वसन खाते दिलेले नाही. महसूल खात्यातही खडसेंनी कोणतेही काम करण्याची संधी दिली नाही. मी घेतलेल्या निर्णय अधिका-यांना फिरवण्यास सांगतात. त्यामुळे मी फक्त नावालाच मंत्री आहे असे मला वाटू लागले आहे. जर अशीच वागणूक देणार असेल तर आपण मंत्री म्हणून काम करण्यास इच्छुक नाही. त्यापेक्षा एक शिवसैनिक म्हणून लोकांची कामे करण्यास मला आवडेल असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांचा मागील पाच-सहा महिन्यांपासून शिवसेनेसोबतचा विरोध वाढीला लागला आहे. यामागे भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याची फूस असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच खडसे यांची गाडी सुसाट आहे. या नेत्यामुळेच खडसे मुख्यमंत्री फडणवीस यांनाही जुमानत नाहीत. तसेच मागील पाच-सहा महिन्यांपासून शिवसेनेला खिंडीत गाठण्याची एकही संधी खडसेंनी सोडली नाही. आता त्यांच्या महसूल विभागाचे राज्यमंत्री संजय राठोड शिवसेनेचे आहे. त्यांच्या माध्यमातून खडसे राठोडांना त्रास देण्यात कोणतेही कसूर ठेवत नाहीत. त्यामुळेच संजय राठोड यांनी त्यांच्या कार्यपद्धतीला वैतागून आपल्या पक्षप्रमुखांकडे गा-हाने गात राजीनामा सोपवला आहे. उद्धव यांनी राठोड यांना भेटीला बोलावले असून, दोन-तीन दिवसात त्यांचे म्हणणे ऐकून भाजप नेत्यांकडे व मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ असे आश्वासन उद्धव यांनी राठोड यांना दिल्याचे कळते आहे.
संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार आहेत. यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघातून ते सलग तीनदा निवडून आले आहेत. 2004 साली संजय राठोड यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता.
उद्धव यांनी मातोश्रीवर बोलावली सर्व आमदार-खासदारांची बैठक
दरम्यान, भाजपसोबतची सत्ता व भाजपच्या काही मंत्र्यांकडून, नेत्यांकडून होत असलेली कोंडी याबाबत उद्धव यांच्याकडे विविध ठिकाणाहून तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पक्षाची काय भूमिका असावी व कोणती भूमिका घ्यावी याचा विचारविमर्श करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांची बैठक येत्या दोन दिवसात मातोश्रीवर आयोजित केल्याचे समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला सत्तेत सामावून घेतले आहे. मात्र, भाजपचे काही नेते व मंत्री शिवसेनेची जेथे कोठे गळचेपी करता येईल तेथे करीत असल्याच्या तक्रारी उद्धव यांच्याकडे वारंवार येऊ लागल्याने उद्धव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात भाजपसोबतच्या संबंधाबाबत चर्चा होईल असे समजते आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला जोरदार झटका बसल्याने शिवसेनेने संधी साधून भाजपचे नाक दाबायचे धोरण ठरविल्याचे दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीने शिवसेनेला खुले आव्हान दिल्याने भाजपवर दबाव वाढला आहे. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढून सरकारमधून बाहेर पडत फडणवीस सरकार पाडावे. आम्ही शिवसेनेला मदत करू व निडवणुकीस सामोरे जाऊ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी निकालानंतर केले होते.