अरविंद केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
6

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

.नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हजारो दिल्लीकरांच्या साक्षीने त्यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
केजरीवाल यांच्यासह सहा मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. आपचे नेते मनीष सिसोदिया, असिम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंदर जैन, गोपाल राय आणि जितेंदर सिंग तोमर यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवालांनी जनतेला उद्देशून भाषणही केले. लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक आम्ही आणू. तसेच सर्वप्रथम दिल्ली भ्रष्टाचारमुक्त कशी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करु असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.
बरोबर वर्षभरापूर्वी केजरीवाल यांनी याच दिवशी दिल्ली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत ‘आप’ने अभूतपूर्व यश मिळवले. ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा सोहळा झाला. य़ा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रित कऱण्यात आले होते. मात्र महाराष्ट्राचा पूर्वनियोजित दौ-यामुळे ते या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाही. मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.
मैदानावर तसेच परिसराबाहेर सर्वत्र पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मैदानात सुरक्षेच्या कारणावरुन नऊ आणि मैदानाच्या बाहेर १० एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी शेकडो सीआईएसएफचे जवान तैनात कऱण्यात आले होते.