गोर्‍या वर्णामुळेच सोनिया गांधी कॉंग्रेस अध्‍यक्षा

0
16

पाटणा- केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. सोनिया गांधी या गोर्‍या असल्यामुळे त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी नायजेरियन युवतीसोबत विवाह थाटला असता तर त्या युवतीला कॉंग्रेसने पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारले असते काय? असा खोचक सवाल देखील गिरीराज सिंह यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर राहुल गांधी हे मलेशियाचे बेपत्ता प्लेन असल्याचा टोला सिंह यांनी लगावला आहे.

हमीरपूरमध्ये आज (बुधवारी) एका पत्रकार परिषदेत ग‍िरीराज सिंह यांनी वरील वक्तव्य केले. सिंह यांनी सोनिया गांधी यांचासह देशभरातील महिलांचा अपमान केला आहे. सिंह यांच्या बेजबाबदार वक्तव्याला काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयातील जबाबदार केंद्रीय मंत्र्यांने महिलांविरोधात केलेले बेजबाबदार वक्तव्य दुर्दैवी असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. गिरीराज सिंह यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील कॉंग्रेसने केली आहे