महिला सदस्याची दबंगगिरी; कर्मचा-याला बुक्क्यांनी मारहाण

0
16

औरंगाबाद – मागील एक वर्षापासून बांधकामासंबंधी माहिती मागवली, पण ती दिली जात नसून कर्मचारी उद्धट भाषा वापरत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य नंदा काळे यांनी बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायक अरुण गावंडे यांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी जि. प. कार्यालयात घडली.

दुपारी १.३० ते १.४५ वाजेदरम्यान गावंडे कार्यालयात बसलेले होते. त्यावेळी महालगाव सर्कलच्या सदस्या नंदा काळे त्यांचे पती व इतर दोघे जण कार्यालयात आले. तीन वर्षांपासून माझे काम का झाले नाही, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावरून जवळपासच्या कर्मचा-यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्या कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. नंदा यांनी थेट गावंडे यांना चापटा, बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. काही कर्मचा-यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पतीने कोणीही मध्ये यायचे नाही, अशी तंबी दिली. कार्यालयीन सहायक ए. के. खान यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही काळे यांनी गावंडे यांची गचांडी धरून कार्यालयाबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थीमुळे हा प्रकार थांबला.
जि. प. कर्मचारी आणि काळे यांच्यात झालेला वाद “अर्थ’कारणावरून झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्मचारी अगदी किरकोळ कामासाठीही अपेक्षा ठेवतात. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने काळे यांचा पारा सरकला आणि त्यांनी हात उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.