मान्सून १ जूनला केरळात बरसणार..

0
8

पीटीआय,
नवी दिल्ली,दि. 11 –मान्सून केरळमध्ये १ जूनला येईल, अशी अपेक्षा असून, पाऊस मात्र सरासरीपेक्षा कमी होईल; त्यामुळे सरकारला पीक विमा व आपत्कालीन योजना जाहीर कराव्या लागतील, असे सूतोवाच हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने केले आहे. मान्सून लवकर येणार असला तरी पाऊस कमी पडण्याच्या वृत्ताने शेतक ऱ्यांच्या चिंतेत भरच पडणार आहे.
पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी खाते आपत्कालीन योजना तयार करीत असून कमी पावसामुळे खरिपाच्या पिकांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. कृषी सचिव सिराज हुसेन यांनी सांगितले, की राज्य सरकारांना ५८० जिल्ह्य़ांसाठी योजना तयार करण्यास सांगितले असून पीक विमा योजनाही शेतक ऱ्यांमध्ये लोकप्रिय केली जाईल. भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मान्सून सुरळीतपणे केरळात येईल. त्यात २-३ दिवसांचा फरक होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीनुसार पावसाला विलंब होणार नाही, पण मान्सूनला एल निनोचा फटका बसणार असून पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. नैर्ऋत्य मान्सून हा खरिपाच्या भात पिकासाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे कमी पाऊस झाल्यास भाताच्या पिकास फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी देशात सरासरीच्या १२ टक्के कमी पाऊस पडला, त्यामुळे कापूस व तेलबियांना फटका बसला. मार्च व एप्रिलमध्ये अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांना अडचणीत टाकले व त्यामुळे शेतक ऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार घडले होते.
१५ मेच्या अंदाजाकडे लक्ष
स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले, की मान्सून १ जूनला येईल, त्यात २-३ दिवसांचा फरक पडू शकतो. भारतीय हवामान खात्याने २०१५ मध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असले, तरी १५ मे रोजी दिला जाणारा सुधारित अंदाज महत्त्वाचा ठरणार असून, त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.