नक्षल-पोलिसांमध्ये चकमक सुरु, एक गावकरी गंभीर

0
9

वृत्तसंस्था
पाटणा दि. २२ – झारखंडच्या सीमेलगत बिहारच्या नवादा जिल्ह्यातील नावाडीह जंगलात सोमवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून दुपारपर्यंत फायरिंगचे आवाज येत होते. पोलिस अधीक्षक डॉ. परवेझ अख्तर म्हणाले, ‘ नावाडीहच्या जंगलात पोलिस छापेमारीसाठी गेले होते. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळाबार केला. बिहार पोलिस आणि सीआरपीएफ यांची ही संयुक्त कारवाई आहे.’
नावाडीहचे गावकरी रंजीत उर्फ कुकु मोची आणि भोला यादव गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. तेव्हा नक्षलवादी आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांना ओलीस ठवले. गावकऱ्यांनीविरोध केल्यानंतर त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात रंजीत आणि भोला गंभीर जखमी झाले. भोला अजूनही नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. रंजीतची प्रकृती गंभीर असल्याने नक्षलवाद्यांनी त्याला सोडून दिले. त्याला नवादा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्याच्या आधारे पोलिस नक्षलवाद्यांवर हल्ला करण्यासाठी गेले. नक्षलवादी नावडीह जंगलात 20 जूनपासून दडून बसले असल्याची माहिती आहे. गावकऱ्यांना त्यांनी जगंल प्रवेशबंदी केली होती. येथे त्यांची बैठक सुरु होती. गावकरी जंगलात गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला.