महिलांच्या हक्कासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार-चित्रा वाघ

0
7

गोंदिया, दि. ७-गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महिलांवरील अन्याय अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश राज्यांना मागे घालत या अत्याचाराच्या घटनांमध्ये आपला राज्य आघाडीवर चालल्याचा घणाघाती आरोप करीत महिलांच्या सुरक्षेसाठी व रक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी रस्त्यावर उतरून महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या आज सोमवारी गोंदियात आल्या होत्या,त्यावेळी नमाद महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.त्यांच्यासोबत गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,नागपूरच्या जिल्हाध्यक्ष दीप्ती काळमेघ व नगरसेविका प्रगती पाटील उपस्थित होत्या.
श्रीमती वाघ पुढे म्हणाल्या की,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात महिलांच्या हक्कासाठी आमची आघाडी काम करीत आहे.१८-३५ वयोदरम्यानच्या महिला,युवती या आमच्या पक्षापासून दूर असल्याचे लक्षात येताच खासदार सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटन तयार करण्यात आले.देशातील युवतींसाठी संघटन तयार करणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.महिला आघाडीने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले असून आरोग्य सुविधांसोबतच युवती व महिलांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील याकडेही लक्ष असल्याचे म्हणाले.महिलावंरील वाढत्या अत्याचाराचे आकडे बघून शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणणे म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासारखी परिस्थिती विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि पोलीस विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झाली आहे.
राज्यात मुलीवंर वाढलेल्या अन्याय अत्याचार बघून सरकारच्याविरोधात निवेदन देऊन न्याय मिळेल असे वाटत नसल्याने आता आम्ही मेमोरेंडमपेक्षा रस्त्यावर उतरून असवेंदनशिल सरकारच्या विरोधात संघर्षपूर्ण आंदोलन करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रकारपरिषदेला माजी महिला काँग्रेस अध्यक्ष प्रिया हरिणखेडे,जिल्हा परिषद सदस्या दुर्गा तिराले,खुशबू टेंभरे,लता रहागंडाले आदी उपस्थित होत्या.पत्रकारपरिषदेनंतर त्यांनी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाèयांना आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले.