कोंडेकलच्या जंगलात आढळला आणखी एका नक्षल्याचा मृतदेह?

0
8

गडचिरोली, दि.७: ३ सप्टेंबरच्या संध्याकाळी गट्टा(फुलबोडी)पोलिस मदत केंद्रांतर्गत कोंडेकल जंगलात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाली होती. या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर कोंडेकलच्या जंगलात आणखी एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती आहे.
३ सप्टेंबरच्या संध्याकाळी गट्टा(फुलबोडी)पोलिस मदत केंद्रांतर्गत कोंडेकल जंगलात झालेल्या चकमकीत कंपनी क्रमांक १० ची सदस्य कुंजो उर्फ रंजू जिजा मज्जी(२७)रा.धोडराज ता.भामरागड ही महिला नक्षलवादी ठार झाली होती. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्रे व पुस्तके मोठया प्रमाणावर ताब्यात घेतली होती. दरम्यान परिसरात नक्षल शोध मोहीम तीव्र करण्यात आली असतानाच आज कोंडेकलच्या जंगलात एके ठिकाणी दुर्गंधी येऊ लागली. गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासणी केली असता एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह जमिनीत पुरल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष हा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. मात्र याविषयी पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही.