राष्ट्रपती राजवट लागू करून दाखवा- ममता

0
12

कोलकता (पीटीआय) – शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने तृणमूल कॉंग्रेसचे खासदार श्रींजय बोस यांना अटक केली. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर व सीबीआयवर कडक टीका केली आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि मला केंद्र सरकार ठरवून लक्ष्य करत असल्याचा आरोप करीत ममता यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि आपल्याला अटक करून दाखविण्याचे केंद्राला आव्हान दिले.

बोस यांच्या अटकेमुळे संतापलेल्या ममता आज पक्षाच्या बैठकीत म्हणाल्या, ‘त्यांना मला तुरुंगात टाकू द्या. त्यांच्याकडे किती मोठा तुरुंग आहे, हे मला पाहू द्या. आपल्यावर हल्ला झाला, तर आपण प्रतिकार करू. सर्व आव्हाने स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. कार्यकर्त्यांनी भाजपला घाबरून जाऊ नये.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे मी केंद्राला आव्हान देते.
आम्ही सत्तेचे गुलाम नाही.आम्ही लोकसेवक आहोत. कारवाई करण्यामागील सीबीआयचा हेतू चांगला दुष्ट आहे. याआधीही सीबीआयच्या वर्तनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे, असे ममता यांनी या वेळी सांगितले. तसेच, मी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या झालेल्या बैठकीत सहभाग घेतला म्हणूनच बोस यांच्यावर ही कारवाई झाली आहे. मात्र, कारवाईंना मी घाबरत नाही. अशा आणखी हजार बैठकांना मी हजर असेन, असेही त्यांनी सांगितले.

भाजप अथवा कॉंग्रेसची माझ्याविरुद्ध लढण्याची ताकद नाही. त्यामुळेच ते कट करत आहेत, अशी टीकाही ममता यांनी केली आहे. सरकारच्या या धोरणाविरुद्ध 24 नोव्हेंबरपासून निदर्शने करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खासदार बोस यांना अटक करण्यामागे सीबीआयकडे “योग्य कारण‘ असेलच, असे पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी म्हटले आहे. हे कारण समजून घेतल्याशिवाय या प्रकरणी भाष्य करणे योग्य नाही, असे ते या वेळी म्हणाले.