‘…म्हणून चंद्रकांत पाटील यांची सीबीआय चौकशी करावी’; राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मागणी

0
38

पुणे – आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमुळे आता पुण्यात राजकारण तापलेलं दिसत आहे. पुण्यात सत्तेत असलेल्या भाजपवर राष्ट्रवादीने वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीने थेट कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून भ्रष्टाचाराने कळस गाठलं असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बोलत असताना जगतापांनी याबाबत भाष्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील कोथरुडच्या मतदार संघातून निवडून आल्यानंतर त्यांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे, असं जगताप यांनी म्हटलं आहे. काळ्या यादीत असलेल्या भाजप आमदार प्रसाद लाडांच्या कंपनीला 41 कोटींची निविदा देण्यात आली असल्याचं प्रशांत जगतापांनी सांगितलं आहे. तसेच भाजपकडून पुणेकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील प्रशांत जगताप यांनी केला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांकडून होत असलेल्या गैरव्यवहाराची तसेच महपालिकेच्या निविदाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रशांत जगतापांनी या बैठकीत केली आहे. तसेच या प्रकरणाबाबत जगताप पालकमंत्री अजित पवारांकडे देखील तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे.