मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार?; सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

0
12

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आंदोलने करण्यात आली. मराठा आरक्षणाला केंद्र सरकारचा पाठिंबा मिळावा यासाठी संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींची भेट मागितली होती. त्यानंतर गुरूवारी संभाजीराजे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे.

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजप खासदार संभाजीराजे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे होते.

गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक दारिद्र्यामुळे मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मागासलेला राहिला आहे. मराठा समाजाला समाजाच्या मुख्यप्रवाहास आणण्यासाठी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना सांगितलं आहे. तर आरक्षणासाठी घालण्यात आलेली 50 टक्के मर्यादा शिथील करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार आता शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे निवदेन दिलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सुकर होण्याची शक्यता आहे.