लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
32

पुणे-लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर पक्षप्रवेशासाठी आजचा मुहूर्त ठरला होता, त्यानुसार पुणेकर आणि  गायिका देवयानी बेंद्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. “राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,” असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, सुरेखाताईं पुणेकर यांचे मंचावरील काम महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्यसरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतर‌ही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा‌ सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जाती – धर्मातील लोक आहेत. त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे ही शरद पवारसाहेबांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल.

दरम्यान, पुणेकर यांच्या पक्षप्रवेशापूर्वी भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. यासंदर्भात एबीपी माझासोबत बोलतांना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल”

“सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भाजपा सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही.”, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या होत्या.