काँग्रेस आक्रमकः राष्ट्रवादी अस्वस्थ

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- शेतकरी मदत, दुष्काळ आणि दलित हत्याकांडासारख्या मुद्दय़ांवरून सत्ता गेल्यानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक झाली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ आहेत. परिणामी, कार्यकर्त्यांमधील नाराजीची दखल घेत भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने सरकारच्या विरोधात येत्या अधिवेशनात आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी घेतला.
काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून विविध प्रश्न हाती घेत सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विश्वासदर्शक ठराव गोंधळात मंजूर करताच काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राज्यपालांना रोखून धरले. विदर्भातील कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत आणि उपनेते विजय वडेट्टीवार हे सध्या विदर्भात पक्षाची ताकद वाढविण्याकरिता दौरे करीत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
काँग्रेसने जिल्हा आणि तालुका पातळीवर जोर लावल्याने राष्ट्रवादीत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यवतमाळमधील आमदार संदीप बजोरिया यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावर पक्षाकडून काहीच भूमिका घेतली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा विदर्भातील शेतकऱ्यांना मदत व त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता आमदारांनी आक्रमक व्हावे, अशी सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली. काँग्रेसने मराठवाडा आणि विदर्भात जोर लावल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. उद्या अशीच परिस्थिती राहिल्यास काँग्रेस आपल्याला मागे टाकेल, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती आहे.
अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार
भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा दिला असल्याने राष्ट्रवादी सध्या काहीच भूमिका घेत नाही, हे चित्र निर्माण होणे राष्ट्रवादीसाठी अडचणीचे ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, जवखेडय़ाचे हत्याकांड आदी विविध प्रश्नांच्या संदर्भात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.