शिवसेनेशी पंगा घेऊ नका, महागात पडेल

0
17

नागपूर- हनुमान चालिसा व श्रीरामप्रभू हे आमचे र्शद्धास्थान असून आमची त्यांच्यावर आस्था आहे. शिवसेनेशी पंगा घेऊ नका, महागात पडेल. महाराष्ट्रात फिरणे मुश्कील होईल, असा इशारा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिला.
डिप्टी सिग्नल चौकात शिवसेनेचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. आशिष जयस्वाल, आ. दुष्यंत चतुर्वेदी, सहायक संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया, शहर प्रमुख प्रवीण बरडे, दीपक कापसे, अलका दलाल आदी उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. छत्तीसगडी समाजाने आज शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद देत गर्दी केली. ही गर्दी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जमा झाली आहे. नागपूरची हवा बदलली की देशाची हवा बदलेल हे या मेळाव्यातून आता सिद्ध झाले आहे. सध्या मुंबईत राडा चालू आहे. महागाईवरून लक्ष विचलित करण्याकरिता काही नौटंकीबाज हनुमान चालिसा पठण करणार आहेत. हे पठण करणारे नौटंकीबाजांनी शिवसेनेशी पंगा घेऊ नये. ते त्यांना महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. शिवाजी महाराजांना दगा देणारा खंडोजी खोपडे होता. या मतदारसंघातील आमदाराची खोपडीही उलटी आहे. या मतदारसंघातील लोक परत त्याला विधानसभेवर जाऊ देणार नाही, नागपूर महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे. तो बाहेर काढून शिवसेना नागपूर महापालिकेवर भगवा फडकवेल, असा विश्‍वास व्यक्त करताच शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. यावेळी आ. आशिष जयस्वाल यांनी नागपूरमध्ये परिवर्तनाची लाट येईल, शिवसेनेने राजधानी काबीज केली असून उपराजधानीही काबीज करेल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला. आजवर माझ्या कुटुंबावर डिप्टी सिग्नलमधील नागरिकांनी प्रेम केले आहे, तसेच प्रेम कायम ठेवा, असे आवाहन आ. दुष्यंत चतुर्वेदी यांनी केले. या मेळाव्याला हजारो नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. खा. संजय राऊत यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा व तलवार भेट देऊन स्वागत करण्यात आले.