परस्पर समन्वयातून जनसंपर्क क्षेत्रात विधायक उपक्रम राबविणे आवश्यक

0
16

नागपूर-जनसंपर्क कौशल्याच्या ताकदीवर समाजात सहकार्य व विश्‍वासाची भावना निर्माण करणे शक्य आहे. यासाठी जनसंपर्क क्षेत्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांनी परस्पर समन्वयातून एकत्रितपणे विधायक उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी व्यक्त केले.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय)च्यावतीने रविभवन सभागृहात आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी वेस्टर्न कोल फिल्डचे प्रशासन व जनसंपर्क महाव्यवस्थापक पी. नरेंद्रकुमार, ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा महाजेनकोचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, डेहराडून ‘पीआरएसआय’च्या प्रतिनिधी डॉ. विनिता बॅनर्जी, नागपूर ‘पीआरएसआय’च्या नागपूर विभागाचे अध्यक्ष एस. पी. सिंग यांची यावेळी उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी म्हणून कोरोना काळात केलेल्या कामगिरीची दखल घेवून यशवंत मोहिते यांना यावेळी -‘पीआरएसआय’च्यावतीने बेस्ट ‘पीआरओ ऑफ दि इयर’ या पुरस्कारानिमित्त मोहिते यांचा स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप देऊन हेमराज बागुल यांनी गौरव केला. पुढे बागुल यांनी सांगितले की, जनसंपर्क कौशल्यामध्ये फार मोठी ताकद असून गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या सावटाखाली जगलेल्या समाजामध्ये विश्‍वास आणि सहकार्याची भावना रुजविण्यासाठी जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्थांनी पुढे येणे आवश्यक आहे. समाज आणि संस्थांना जोडण्याचे काम जनसंपर्क विभागामार्फत होते. पीआरएसआयच्या माध्यमातून कोरोना काळात अनेक चांगले उपक्रम राबविले गेले. असे विधायक उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी जनसंपर्क क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न केल्यास त्याचा समाजाला आणि आपल्या संस्थांनाही फायदा होईल, असे बागुल यांनी यावेळी सांगितले.
समाज माध्यमांच्या वाढत्या वापराने जनसंपर्काचे क्षेत्र अधिक विस्तारले आहे, या क्षेत्रात नवीन साधने, तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. त्याचा वापर करताना त्याविषयीची जाण आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. जनसंपर्क ही आपली ताकद असून या क्षेत्रातील आधुनिक साधनांच्या वापराविषयीचे ज्ञान आत्मसात करून आपण सज्ज होणे आवश्यक असल्याचे बागुल म्हणाले. जनसंपर्क क्षेत्रात काम करत असताना कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच काही लोकांचे जीव वाचविण्याचे समाधान लाभले, असे सत्कारमूर्ती मोहिते यांनी यावेळी सांगितले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध साधने, समाज माध्यमांचा वापर करून प्रभावी जनसंपर्क करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन मनोजकुमार यांनी केले. तर माहिती व जनसंपर्कचे माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी आभार मानले.