उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब घेतली ‘मातोश्री’बाहेर पहारा देणाऱ्या ‘फायर’ आजींची भेट

0
104

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी चंद्रभागा शिंदे या 80 वर्षीय शिवसैनिक आजीची सहकुटूंब भेट घेतली. या आजींनी शनिवारी राणा दाम्पत्याविरोधात ‘मातोश्री’बाहेर तळपत्या उन्हात आंदोलन केले होते. त्यात त्यांनी पुष्पा या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘मै झुकेगा नही साला’ हा डायलॉग मारुन सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते.

80 वर्षीय आजी झाल्या भावूक

कालपासून एक आजी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. झुकेंगे नहीं म्हणत शिवसेनेच्या रणरागिणी ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने मातोश्रीबाहेर पाहिला आहे. यानंतर आजीच्या भेटीला शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री घरी आल्याने आजीं चंद्रभागा शिंदे यांच्या घरी दिवाळी सारखेच वातावरण होते. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असल्याचं आजी मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या.बाळासाहेबांच्या कुटुंबियाचे पाय घराला लागले आणि मनाला आनंद झाला अशी प्रतिक्रिया आजींनी दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माणसाचे वय कितीही वाढले, तरी तो मनाने तरुण हवा, असे बाळासाहेब म्हणायचे. या आजी अजूनही तरुण आहेत. वय वाढले आहे. पण त्या अजूनही युवासेनेच्याच कार्यकर्त्या आहेत, अशा शब्दांत ठाकरेंनी आजींचे कौतुक केले.​​​​​​​ शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंनी जे आशीर्वाद दिले. ते आजीच्या रुपाने आमच्या सोबत आहेत. आजी बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिक आहेत. त्यामुळे झुकने वाले शिवसैनिक कोणीच नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आंब्याची पेटी भेट म्हणून दिली. तर रश्मी ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली.

आजींचा मातोश्री बाहेर पहारा

आजीने मातोश्री बाहेर येत पुष्पा स्टाईलने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना जोरदार इशारा दिला. त्या 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आज्जी यांच्या घरी ठाकरे कुटुंबियांनी भेट दिली आहे. यावेळी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केले, यावेळी या आजी उपस्थित होत्या. आणि तेव्हापासून आजींच्या स्टाईलची चर्चा सोशल मिडीयावर जोरदार सुरू आहे.