भंडारा- अनेक मोठे नेते भाजपात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. उद्याही निवडणूक झाली तरी भाजपा सज्ज आहे. २0२४ मध्ये भाजपा व बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती कायम राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राज्यात दोनशेवर विधानसभा तर ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याची तयारी केली असल्याचे आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार विकासाला गती देणारे असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
भंडारा जिल्ह्याच्या दौर्यावर आले असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे विकासात अडथळे येणार नाही. प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्ष संघटना बळकटीकरणासाठी राज्यात दौरे करीत आहे. प्रत्येक बूथवर नवीन २५ कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात येईल. एका बूथवर ५0 युवा वॉरिअर्स राहणार आहे. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण बहाल केल्यामुळे समाजातील अठरा पगड जाती, बारा बलुतेदार भाजपमध्ये येताना दिसत आहे. महिला सक्षमीकरणाच्या योजनाही तयार करतो आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ तास काम करीत आहेत. दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे वेगाने काम करीत असल्याने गेल्या अडीच वर्षाचा भंडारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २0२४ मध्ये केंद्रातील सरकार व आताच्या सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवून नगर पालिका, मनपा, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा जिंकणार असल्याचे ते म्हणाले. एक कार्यकर्ता २0 घरापर्यंत पोहोचून राज्य सरकारच्या योजना, आरोग्य सुविधा पोहोचल्या की नाही, यावर लक्ष ठेवणार आहे. यासाठी पालकत्व योजना तयार केली आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कॉंग्रेसच्या काळात व आजच्या काळात तीन पटींचा फरक आहे. १0 वर्षांपूर्वीच्या दराची तुलना आज करू शकत नाही. आमच्या सरकारने यात पाच ते सात रुपये कमी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वीच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दरावर देशातील पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर ठरतील, असे करून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. तरीही याबाबत जनतेच्या भावना निश्चितच सरकारला कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील तीन व नागपूर ग्रामीणच्या सहा, अशा एकूण नऊ विधानसभा मतदार संघावर स्वत: लक्ष देणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. भंडारा जिल्ह्याच्या विकासाबाबतही येत्या काळात मोठे परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला खा. सुनील मेंढे, आ. परिणय फुके, प्रदेश उपाध्यक्ष व भंडारा जिल्हा प्रभारी संजय भेंडे, प्रदेश दौरा सहप्रमुख विजयराव चौधरी, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, भंडारा-गोंदियाचे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, शहराध्यक्ष संजय कुंभलकर, आशू गोंडाने उपस्थित होते.