अंधेरीत उद्धवांची मशाल अधांतरी:ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर मनपा निर्णयच घेईना

0
42

मुंबई-अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप बृहन्मुंबई महापालिकेने मंजूर केला नाही. बुधवारी याबाबत लटके यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. मात्र, राजीनामा मंजुरीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे लटके यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्याचे ठरले आहे. लटके या मुंबई महापालिकेत के ईस्ट कार्यालयात कार्यकारी सहायक (क्लार्क) म्हणून कार्यरत आहेत.

लटके यांनी दोनदा दिला राजीनामा

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नियमानुसार त्यांना राजीनामा देणे आवश्यक असल्याने त्यांनी २ सप्टेंबरला नोकरीचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी विशेष बाब म्हणून राजीनामा मंजूर करण्यासाठीचा अर्ज, असे नमूद केल्याने प्रशासनाने २९ सप्टेंबरला अर्ज मंजूर करता येणार नाही, असे लटके यांना कळवले. त्यामुळे लटके यांनी ३ ऑक्टोबरला पुन्हा नव्याने राजीनाम्यासाठी पालिकेकडे अर्ज केला. त्यात त्यांनी लवकरात लवकर राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आहे. अर्जानंतर एक महिन्याचा नोटीस कालावधी हा नियम असल्याने एक महिन्याचे वेतन त्यांनी पालिकेकडे भरले आहे.

शुक्रवारी १४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्यापूर्वी नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक असते. मात्र, राजीनामा मंजुरीबाबत काहीही कळवण्यात आले नसल्याने त्यांनी बुधवारी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची भेट घेतली. १४ ऑक्टोबरच्या आत अर्ज मंजूर होईल याबाबत काहीही ठोस उत्तर न मिळाल्याने लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजीनाम्याच्या अटी-शर्ती

1 राजीनामा देताना कायम, हंगामी कर्मचाऱ्यांनी राजीनाम्याची एक महिना अगोदर नोटीस देणे आवश्यक आहे. राजीनाम्याची नमूद केलेली तारीख अमलात यावयाच्या कमीत कमी एक महिना अगोदर त्याने लेखी सूचना पत्र (नोटीस) देणे आवश्यक आहे.

2 त्याप्रमाणे सूचना पत्र दिले नसेल तर त्याने राजीनामा स्वीकृतीवेळी तो ज्या पदाचा राजीनामा देत आहे त्या पदाच्या एक महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम मनपात भरली पाहिजे. राजीनामा स्वीकारल्याचे लेखी कळवेपर्यंत संबंधितांची मनपातील नोकरी सुरू राहील.

नाही तर छाननीत अर्ज होऊ शकतो बाद

निवडणुकीचा अर्ज सादर करताना ऑफिस ऑफ प्राॅफिट (लाभाचे पद) असता कामा नये. उदा. सरकारी नोकरी, कंत्राट, समिती सदस्य इत्यादी. अर्ज सादर करतेवेळी तुम्ही राजीनामा दिलेला असला पाहिजे, अन्यथा छाननीमध्ये तुमचा अर्ज बाद हाऊ शकतो. – अनंत कळसे, विधिमंडळाचे प्रधान सचिव, निवृत्त, मुंबई.

मनपाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू

ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अर्जाबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. ३ ऑक्टोबर रोजी लटके यांनी राजीनामा दिला आहे. अजून या अर्जाला ३० दिवस पूर्ण झालेले नाहीत. आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही नियमाप्रमाणेच काम करतोय. – इक्बालसिंह चहल, पालिका आयुक्त, बृहन्मुंबई.

शिंदे यांच्या पक्षाकडून लटकेंवर दबाव

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल चिन्हावर आपण निवडणूक लढवणार आहोत, असे ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून (शिंदे गट) ऋतुजा यांना उमेदवारीची ऑफर देऊन त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते अ‌ॅड. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बुधवारी केला.

विशेष बाब म्हणून राजीनाम्यासाठी अर्ज

ऋतुजा लटके यांनी विशेष बाब म्हणून राजीनामा मंजूर करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे पालिकेकडून मिळणारे एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन बुडणार आहे. तसेच २० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण न झाल्याने लटके यांना पालिकेकडून निवृत्तिवेतन लागू होणार नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

प्लॅन बी : महाडेश्वर, सावंतांच्या नावाची चर्चा

ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाली तर प्लॅन बी म्हणून माजी मंत्री अ‌ॅड. अनिल परब यांचे विश्वासू प्रमोद सावंत तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवारी मिळू शकते. या शक्यतेबाबत सेनेतील वरिष्ठ नेत्यांत चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

बोगस प्रतिज्ञापत्रप्रकरणी चौकशी सुरू

ठाकरेंच्या सेनेने बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याने मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि नगरच्या कोपरगाव शहरात या प्रकरणांची चौकशी करत आहेत. ठाकरेंच्या समर्थनात दिलेली ४६०० हजार प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा आरोप शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आला आहे.