पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला

0
53

गडचिरोली- कुरखेडा उपविभागातील मालेवाडा पोमके अंतर्गत येत असलेल्या लड्डूडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी कुकर बॉम्ब व क्लेमोर लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. मात्र पोलिस जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा घातपातांचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिस दलाला मोठे यश आले आहे.
मालेवाडा हद्दीतील लड्डूडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात पोलिस जवानांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठय़ा प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाली होती.

या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात जवानांना यश आले. यावेळी २ नग जिवंत कुकर बॉम्ब, २ नग क्लेमोर या स्फोटकासह १ नग पिस्टल, २ नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा १ नग र्जमन गंज आदी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. घटनास्थळावर पेरून ठेवलेले नक्षल साहित्य जप्त करुन बीडीडीएस पथकाने स्फोटकाने भरलेले कुकर बॉम्ब व क्लेमोर अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले. तर इतर नक्षल साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक(अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हिंसेची वाट सोडून आत्मसर्मपण करावे
अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बीडीडीएस पथकाच्या जवानांचे पोलीस अधीक्षक यांनी विशेष कौतुक केले. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले. नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसर्मपण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.