सभापती पदावरही केदारांचा वरचष्मा

0
27

नागपूर- जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी सोमवारी (१ नोव्हेंबर) निवडणूक प्रक्रिया पार पडली. चार सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, अवंतिका लेकुरवाळे व राष्ट्रवादीचे बाळू ऊर्फ प्रवीण जोध विजय झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीप्रमाणे सभापती पदाच्या निवडणुकीतही माजीमंत्री सुनील केदार यांचाच वरचष्मा पहायला मिळाला.
जिल्हा परिषदेत काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे नेते माजीमंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सभापती पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते. रामटेक विधानसभा मतदार संघातून दुधाराम सव्वालाखे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु सर्वांना धक्का देत राजकुमार कुसुंबे यांचे नाव जाहीर करण्यात आले. उमरेडमधून मिलिंद सुटे यांची निवड झाली. केदार व माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सुटे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने त्यांचीही सभापतीपदी वर्णी लागली. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना ३८ मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवारांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवणारे नाना कंभाले व प्रितम कवरे हे अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे शिवसेना (शिंदे सर्मथक) सदस्य संजय झाडे यांचीही अनुपस्थिती होती. विरोधी पक्षनेते आतिश उमरे, राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख व काँग्रेस सदस्य शंकर डडमलही हे देखील या निवडणूक प्रक्रियेदरम्यान हजर नव्हते. सोमवारी सकाळीच भाजपची बैठक झाली. निवडणूक न लढल्यास वेगळा संदेश जाईल, असाही सूर निघाल्याने ऐनवेळी भाजपने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

जि.प.तील संख्याबळ पक्ष सदस्य संख्या
काँग्रेस ३२
भाजप १४
राष्ट्रवादी ८
शिवसेना १
शेकाप १
गोंगपा १
अपक्ष १