झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स, उद्या चौकशीसाठी बोलावले

0
7

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हेमंत सोरेन यांना खाण प्रकरणात समन्स बजावले आहे. हेमंत सोरेन यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. खाण प्रकरणातील आरोपी आणि हेमंत सोरेनचे जवळचे पंकज मिश्रा यांच्या घरावर छाप्यादरम्यान ईडीला CM हेमंत सोरेन यांचे बँक पासबुक आणि स्वाक्षरी असलेले चेकबुक सापडले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
झारखंडमधील कथित खाण घोटाळ्यात ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. पंकज मिश्रा यांना ईडीने 19 जुलै रोजी पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. मिश्राशिवाय बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दोघांना 4 आणि 5 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने 24 ऑगस्ट रोजी प्रेम प्रकाशच्या घरावर छापा टाकला होता. दरम्यान, ईडीला झारखंड पोलिसांच्या दोन एके-47 रायफलही मिळाल्या आहेत.

ईडीने यापूर्वी हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा, दाहू यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 37 बँक खात्यांमधील 11.88 कोटी रुपये पीएमएलए कायदा, 2002 अंतर्गत जप्त केले होते. यापूर्वी ईडीने साहिबगंज, बरहैत, राजमहल, मिर्झा चौकी आणि बरहरवा येथे 19 ठिकाणी छापेमारी केली होती.

ईडीने आरोपपत्र दाखल केले
ईडीने 16 सप्टेंबर रोजी पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी कोषाध्यक्ष रवी केजरीवाल यांचा जबाबही नोंदवला आहे. त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पंकज मिश्रा यांना संथाल परगणा येथून दगड आणि वाळू उत्खननातून येणारा पैसा थेट प्रेम प्रकाशला देण्यास सांगितले होते, असा आरोप आहे.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, ईडीने ८ जुलै रोजी टाकलेल्या छाप्यादरम्यान पंकज मिश्रा यांच्या निवासस्थानातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये सोरेन यांचे पासबुक देखील आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, एका बंद लिफाफ्यात एक पासबुक आणि दोन चेकबुक सापडले आहेत, ज्यामध्ये दोन चेकवर स्वाक्षरीही आहे. हेमंत सोरेन यांचे बँक ऑफ इंडिया साहिबगंजमध्ये खाते आहे.