हजारीबाग – जम्मू-काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांनी १२ तासांत चार हल्ले करून घातलेले थैमान म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्लातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदानापूर्वी हजारीबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. पंजाब रेजिमेंटचे ले. कर्नल संकल्प कुमार यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही व त्यांच्यापासून प्रेरणा घेईल असे सांगत त्यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांना अर्पण केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला संपूर्ण बहुमताने जिंकून दिल्याबद्दल त्यांनी झारखंडवासियांचे आभार मानले. एक स्थिर सरकार आल्यावरच नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या झारखंडचा व इथल्या लोकांचा संपूर्ण विकास होऊ शकतो, असे सांगत त्यांनी भाजपाला बहुमताने निवडून द्या असे आवाहनही मतदारांना केले.
झारखंडमधील सरकारने लोकांना खूप लुटले, आजपर्यंत फक्त जातीवादाचे, लुटालुटीचे, फोडा-फोडीचे राजकारण होत होते. मात्र आम्हाला आता विकासाचे राजकारण करायचे आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. येथील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्याचा विकास होणे महत्वाचे आहे. आम्हाला झारखंडची परिस्थिती बदलायची आहे, लोकांना खुशाल, आनंदी जीवन द्यायचे आहे, असे सांगत भाजपाला बहुमत द्या या आवाहनाचा पुनरुच्चार त्यांनी केला.