चिंचवडमध्ये बंडखोर राहुल कलाटेंनी बिघडवलं महाविकास आघाडीचं गणित

0
31

पुणे:- पुण्यातील कसबा व चिंचवड विधासनभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. कसब्यात भाजपला महाविकास आघाडीनं धक्का दिला असला तरी चिंचवडची जागा मिळवण्यात आघाडीला अपयश येताना दिसत आहे.राहुल कलाटेंची बंडखोरी आघाडीच्या विजयाचे गणित बिघडवणारी ठरली आहे.

भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्यात जमा आहे. सोळाव्या फेरीअखेर धंगेकर हे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यापेक्षा सहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीला हा चमत्कार करता आलेला नाही.

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थानिक नेते राहुल कलाटे हे उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेचा नाइलाज होता. परिणामी कलाटे यांनी इथून बंडखोरी करून निवडणूक लढवली. चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे गटनेते असलेले कलाटे हे मतदारांना परिचित होते. तब्बल ६१ कोटींची संपत्ती असलेले कलाटे हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवार होते. त्यामुळं त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार हे सुरुवातीपासूनच बोलले जात होते.त्यातच वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांच्यासाठी सभा घेत त्यांना ताकद दिली होती. त्याचा परिणाम निकालात दिसला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नाना काटे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. अपक्ष राहुल कलाटे हे तिसऱ्या स्थानी असले तरी त्यांनी भरघोस मते खेचली आहेत. त्यांनी घेतलेल्या मतांचा आकडा बघता त्यांनी आघाडीचे विजयाचे गणित चुकवल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांना ३५,९३७ मतं मिळाली आहेत. नाना काटे यांना २८,५११ मतं मिळाली आहेत तर, कलाटे यांनी तब्बल ११,४२९ मते खेचली आहेत. पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचा फरक सुमारे ७ हजारांचा आहे. यावरून कलाटे यांनी आपली ताकद दाखवून दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.