शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घ्या, ठाकरे गटाचे नरहरी झिरवळ यांना निवेदन

0
19

मुंबई-शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घ्या, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले आहे.

79 पानांचे निवेदन

ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधिमंडळात जात नरहरी झिरवळ यांची भेट घेतली व त्यांच्याकडे जवळपास 79 पानांचे निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती देताना सुनील प्रभू यांनी सांगितले की, आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आज आम्ही केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या विधिमंडळात नसल्याने त्याबाबतचे निवेदन आम्ही उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले आहे.

लवकरात लवकर निर्णय घ्यावा

सुनील प्रभू यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयानेच लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. तशीच मागणी आम्ही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाहेरील एकही मनाचा शब्द आम्ही निवेदनात लिहिलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आमच्या निवेदनाबाबत विचार करतील, अशी अपेक्षा आहे.

लवकर निर्णय न दिल्यास

सुनील प्रभू म्हणाले, लवकरात लवकर म्हणजे नेमका किती दिवसांत निर्णय अपेक्षित आहे, हे आम्ही सांगू शकत नाही. विधानसभा अध्यक्षांनी त्याबाबत काय तो निर्णय घ्यावा. मात्र, निकाल येऊन जेमतेम दोन दिवस झाले आहेत. आज कुठे निकाल आमच्या हाती आला आहे. त्या निकालाची प्रतही आम्ही निवेदनासोबत दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घेतला नाही तर काय करायचे, हे पुढे पाहू, असे वक्तव्यही सुनील प्रभू यांनी केले.

आधी 16 आमदारांबाबत निर्णय घ्या

दरम्यान, केवळ शिंदे गटाच्या 16 आमदारांबाबत नव्हे तर ठाकरे गटाच्या आमदारांबाबतही अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे, असे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सुनील प्रभू म्हणाले, शिवसेनेच्या सर्वच आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर आल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे त्यांनी आधी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा. त्यानंतर उर्वरित आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा.