दंगलीमागचा मास्टरमाईंड तातडीने शोधा, अन्यथा इतर शहरांतही अशांतता पसरेल- अजित पवार

0
9

मुंबई-अकोला येथील दंगलीला 24 तास उलटत नाही तोच शेवगावमध्ये दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दंगलीमागील मास्टरमाईंड कोण, याचा शोध तातडीने घ्यावा. अन्यथा ही तणावपूर्ण स्थिती इतर शहरांतही पसरायला वेळ लागणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दंगल घडवण्यामागे हेतू काय?

आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, अकोल्यात दंगल का घडली, याची माहिती मीदेखील घेतली आहे. त्यानुसार सोशल मीडियात एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यात एका समाजाबद्दल आक्षेपार्ह असे काहीतरी होते. त्यामुळे त्या समाजाच्या भावना दुखावल्याने तो समाज प्रचंड आक्रमक झाला व नंतर दंगल घडली. सोशल मीडियावर ती क्लिप कुणी व्हायरल केली, याचा शोध राज्य सरकारने तातडीने घेतला पाहीजे. यामागचा मास्टरमाईंड कोण, त्याचा हेतू काय, याच्या खोलात तातडीने गेले पाहीजे.

तपासात राजकीय हस्तक्षेप नको

अजित पवार म्हणाले, काही शहरांत आताच तणावपूर्ण स्थिती असल्याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे दंगल घडवणाऱ्या आरोपींना आताच ताब्यात घेतले नाही तर ही स्थिती इतर शहरांतही निर्माण होईल. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे हे सत्ताधारी तसेच पोलिसांचे काम आहे. राजकीय हस्तक्षेप न करता पोलिसांना तपास करू द्यावा. तरच ते चांगला तपास करू शकता, असा आपला अनुभव असल्याचे अजित पवार म्हणाले.

जागावाटपासाठी सहा जणांची समिती

दरम्यान, रविवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले, बैठकीत विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. आतापर्यंत मागच्या निवडणुका या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून लढवल्या आहेत. मात्र, आता उद्धव ठाकरे आमच्यासोबत आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांनी लोकसभेच्या 48 जागांचे वाटप कसे करायचे, यावर चर्चा झाली. ही चर्चा करण्यासाठी सहा जणांची समिती बनवली जाईल. त्यात प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य असतील, असा निर्णय झाला आहे. हीच समिती विधानसभेच्या 288 जागांचे वाटप कसे करायचे, यावरही चर्चा करतील.

विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता

2024 मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यताही अजित पवारांनी वर्तवली आहे. पुढे अजित पवार म्हणाले, निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. ऐनवेळी गडबड नको म्हणून आतापासून आम्ही जागा वाटपाची चर्चा करत आहोत. आम्ही निवडणुकांना समोरे जाण्यासाठी तयार आहोत.

वज्रमूठ सभाही होणार

अजित पवार म्हणाले, मविआमध्ये केवळ तीन पक्ष नाहीत, तर त्यांच्याशी संबंधित इतर पक्षही आहेत. त्यांच्या आमदारांची संख्या लहान असली तरी त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे. त्यांनाही निवडणुकांमध्ये सोबत घ्यावे, अशी चर्चा झाली. याशिवाय राज्यात लवकरच मविआच्या वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होतील. त्याचे नियोजन कसे असावे, त्या कुठे व्हाव्यात, त्यात कोणते मुद्दे मांडावेत यावरही बैठकीत खल झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.